25 October 2020

News Flash

अमित शाह यांचे राऊतांनी केलं कौतुक, “शाह हे प्रखर राष्ट्रभक्त आहेत पण…”

भाजपाच्या अनेक धोरणांवर राऊतांनी उघडपणे टीका केली. पण...

अमित शाह यांचे राऊतांनी केलं कौतुक

“अमित शाह हे प्रखर राष्ट्रभक्त आहेत,” असं मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राऊतांनी राजकीय गप्पा मारल्या. या मुलाखतीदरम्यान राजकारणातील वेगवेगळ्या विषयांवर राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या मुलाखतीच्या शेवटी घेण्यात आलेल्या रॅपीड फायर प्रशोत्तरांमध्ये त्यांनी अमित शाह यांचं कौतुक केलं.

ज्यातील महाविकास आघाडी, विरोधीपक्ष, भाजपा अशा अनेक विषयांवर या मुलाखतीमध्ये राऊत यांनी भाष्य केलं. भाजपाच्या अनेक धोरणांवर राऊतांनी उघडपणे टीका केली. तसेच भाजपाचे राजकारण हे माझं ते माझं तुझं ते माझ्या बापचं असं असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. मात्र त्याच वेळी मुलाखतीच्या शेवटी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे कौतुक करताना त्यांना एक सल्ला दिला.

अमित शाह यांच्यातील चांगला गुण कोणता?

कार्यक्रमाच्या शेवटी रॅपीड फायरमध्ये प्रत्येक नेत्याचा चांगला गुण काय आणि त्याला काय सल्ला द्याल असं राऊतांना विचारण्यात आलं. या यादीमध्ये अमित शाह यांच्याबद्दल विचारण्यात आलं असता राऊत यांनी शाह यांच्या राष्ट्रभक्तीचे कौतुक केलं. “अमित शाह हे प्रखर राष्ट्रभक्त आहेत. ३७० संदर्भात असेल किंवा इतर निर्णय असतील त्यांनी आतापर्यंत ज्याप्रकारचे निर्णय घेतले आहेत ते कौतुकास्पद आहे. अनेक हिंमतीचे निर्णय त्यांनी घेतले आहेत,” असं राऊत म्हणाले.

अमित शाह यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की…

याचवेळी अमित शाह यांना सल्ला देताना राऊतांनी देशामध्ये लोकशाही असल्याची आठवण गृहमंत्र्यांना करुन दिली. “शाह हे राष्ट्रभक्त असले तरी त्यांनी देशात लोकशाही आहे हे मान्य केलं पाहिजे. आपला देश लोकशाही देश आहे. अनेक विषयांमध्ये विरोधीचे मत काय आहे हे समजून घेतलं पाहिजे,” असा टोला राऊत यांनी लगावला.

मोदींचा चांगला गुण काय?

“मोदींना काय सल्ला द्याल आणि त्यांचा चांगला गुण कोणता?,” असा प्रश्न राऊतांना विचारला. “नरेंद्र मोदी हे प्रचंड मेहनती आहेत. त्यांच्यासारखी मेहनत कोणी करणार नाही,” असं राऊत मोदींबद्दल बोलताना म्हणाले.

पत्रकार म्हणून मोदींना एकच सांगेन…

“ते देशाचे पंतप्रधान आहेत. काय करायचं आहे याबद्दलची प्रत्येक गोष्ट त्यांना ठाऊक आहे. त्यांना सल्ला द्यायचा मला अधिकार नाही,” असं राऊत यांनी सांगितलं. मात्र पत्रकार म्हणून मोदींना राऊत यांनी एक सल्ला दिला. “पत्रकार म्हणून मोदींना मी एकच सांगेन की त्यांनी त्यांच्या आसपास, सहकाऱ्यांचं काय चाललंय काय नाही ते पहायला पाहिजे,” असा सल्ला राऊत यांनी मोदींना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:09 pm

Web Title: shivsena leader sanjay raut praises amit shah taunts him at same time scsg 91
Next Stories
1 “पत्रकार म्हणून मोदींना एकच सांगेन…”; संजय राऊतांकडून मोदींना सल्ला
2 शरद पवार यांच्यावर प्रचंड निष्ठा आणि विश्वास – संजय राऊत
3 “माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपाचं राजकारण आहे”; राऊतांचा टोला
Just Now!
X