“भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचे आहे असं भाजपाचं राजकारण सुरु आहे,” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सध्याचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपावरही टीका केली.

महाविकास आघाडी सरकारचं प्लॅनिंग कसं?

राज्यामध्ये सध्या असलेले महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण विचार करुनच सत्तेत आले आहे असं राऊत यांनी स्पष्ट केलं. “आत्ता आलेलं सरकार हे टेस्ट ट्युब बेबी नाही. हे व्यवस्थित जन्माला घातलेलं सरकार आहे. याबद्दल आम्ही बऱ्याच आधीपासून प्लॅनिंग केलं होतं,” असंही राऊत यांनी सांगितलं.

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?

राज्यामध्ये महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षासंदर्भात भाष्य करताना भाजपा दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती असंही राऊत यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.  “भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचे आहे असं राजकारण सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘मंत्रीमंडळामधील खाणारी खाती आमच्याकडे ठेवली नाहीत,’ असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शरद पवारांनी सांगितलं की…

“शरद पवार साहेबांनी पाहिल्या दिवसापासुन आपण हे करू शकतो असं सांगितलं होतं. राज्यात काही नवीन घडू शकतं. हे सरकार बनवयाचे आणि टिकवायचे आणि आदेश चालवायचे, असे शरद पवार यांनी सांगितलं होतं. आम्ही हे सरकार पाच वर्ष चालविणार,” असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

राज्यात १०५ आमदाराचा विरोधपक्ष

देशाच्या राजकारणाबद्दल बोलताना सक्षम विरोधीपक्ष ही लोकशाहीची गरज असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केलं. “देशाची लोकशाही बळकट करायची असल्यास, विरोधीपक्ष सक्षम राहिला पाहिजे. यासाठी सत्ताधारी पक्षाने विरोधकांना बळ देण्याची आवश्यकता आहे. राज्यात १०५ आमदाराचा विरोधपक्ष आहे. त्या सर्वांनी या सरकारला किमान वर्षभर काम करण्याची संधी द्यावी,” असं राऊत यावेळी बोलताना म्हणाले.