मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने आम्ही मागितलेल्या १३० जागा दिल्या नाहीत. शिवसेना ज्या जागांवर सतत पराभूत होत होती, त्या जागा मागितल्या होत्या. तरीही त्यांनी त्या दिल्या नाहीत. त्यामुळे नाइलाजाने युती तोडावी लागली. त्याचे दु:ख आहे. मात्र, जनतेने आता भाजपकडे एकहाती सत्ता देण्याची मानसिक तयारी केली आहे. आता भाजपच्या उमेदवारांनी त्यांची झोळी मताने भरून घेण्यासाठी उघडी ठेवावी, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार नाटक कंपनी आहे. त्यात बाबा, दादा आणि आबा दिवसाला हजार रुपयांच्या मानधनावर काम करणारी माणसे आहेत. ‘डायलॉग’साठी पैसे घेतात, काम काहीच नाही, अशी टीका गडकरी यांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराला लकवा लागल्याचे शरद पवारांनीच सांगितले होते. ते निर्णय घेत नसल्यामुळे महाराष्ट्र पुरता बेजार झाला आहे. सिंचन घोटाळ्यात ‘दादा’ होते. ७० हजार कोटींची कामे देऊन सिंचनात वाढ झाली नाही. ‘आबा’ तर पोपटपंची करण्यातच असतात, असेही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीला एकच काम चांगले करता येते, ते म्हणजे भय पसरविणे. दलित-आदिवासी आणि मुस्लिमांना भय दाखवून त्यांनी सत्ता मिळविली. ‘शोले’ चित्रपटात जसे गब्बर आयेगा म्हणून भीती दाखवली जायची, तसे मोदी आयेगा, अशी भीती उगीचच घातली जात होती. गेल्या चार महिन्यात केंद्र सरकारने एकावरही अन्याय करणारा निर्णय घेतला नाही. मराठवाडय़ाच्या विकासासाठी औरंगाबाद येथे ड्राय पोर्ट सुरू करण्याचे ठरविले आहे. अन्यही अनेक हिताचे निर्णय केले जात आहे. महागाई कमी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
 यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विवेक देशपांडे, श्रीकांत जोशी यांच्यासह औरंगाबाद शहरातील मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारांची उपस्थिती होती.