News Flash

शिवसेनेला रत्नागिरीत दुहेरी आनंद मात्र सिंधुदुर्गात धक्का

निकालाने सेनेला सावधगिरीचा इशारा, तर भाजपाला नवचैतन्याचा संदेश दिला आहे. 

|| सतीश कामत 

नगराध्यक्षपदाबरोबर मंत्रिपदाचा लाभ तर सिंधुदुर्गमध्ये दोन्ही बाजूंनी निराशा :- पोटनिवडणुकीत रत्नागिरीचे नगराध्यक्षपद  कायम राखत असतानाच शिवसेनेचे स्थानिक आमदार उदय सामंत यांना अपेक्षेनुसार कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद, हा या जिल्ह्य़ातील शिवसैनिकांसाठी दुहेरी आनंदाचा असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मंत्रिपदाबरोबरच सावंतवाडीचे नगराध्यक्षपदही गेल्यामुळे दुहेरी धक्का आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत विजयी झालेले राहुल पंडित यांनी पक्षांतर्गत तडजोडीनुसार राजीनामा दिल्यामुळे या पदासाठी रविवारी निवडणूक झाली. शिवसेनेचे प्रभारी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी  ही निवडणूक सुमारे एक हजार मतांनी जिंकली. नगर परिषदेत स्पष्ट बहुमत, आमदार सामंतांसारखे नेतृत्व आणि पक्षसंघटन असल्यामुळे हा विजय अपेक्षितच होता. पण या तीन गोष्टींपैकी एकही गोष्ट अनुकूल नसताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी दिलेली लढत शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना नवी उभारी आणि पक्षसंघटनेला बळ देणारी आहे. विशेषत:, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुमारे दोन वर्षे राहिली असताना भाजपा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेत होत असलेला हा बदल सेनेसाठी आव्हान ठरू शकतो.

ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा सेनेचा उमेदवार सहा महिन्यांपूर्वीच ठरलेला आणि विरोधक उमेदवाराच्या शोधात, अशी राजकीय परिस्थिती होती. त्यातच सेनेचे एकहाती वर्चस्व पाहता, किती मतांचे आधिक्य, एवढाच  सेनेसाठी चर्चेचा विषय असेल, असे वातावरण होते. पण भाजपाने जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांना रिंगणात उतरवत निवडणूक प्रतिष्ठेची केली. पक्षाचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे इत्यादींनी जातीने लक्ष क्षातले आणि बघता बघता शहरातील वातावरण बदलून टाकले. त्यामुळे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मिळवलेली आघाडी टिकवताना साळवींची चांगलीच दमछाक झाली. निवडणुकीतील तिसरे प्रमुख उमेदवार मिलींद कीर यांना राष्ट्रवादीकडून मिळवलेल्या उमेदवारीचा काही प्रमाणात जरूर फायदा झाला.  पण या निकालाने सेनेला सावधगिरीचा इशारा, तर भाजपाला नवचैतन्याचा संदेश दिला आहे.

अशा प्रकारे नगराध्यक्षपदाची खुर्ची शबूत राहिल्याबद्दल रत्नागिरीत शिवसैनिक फटाके वाजवत असतानाच स्थानिक आमदार उदय सामंत मुंबईत कॅबिनेट मेत्रिपदाची शपथ घेत होते. युती सरकारच्या काळात म्हाडाचे कॅबिनेट दर्जाचे अध्यक्षपद मिळूनही सामंत फारसे समाधानी नव्हते. त्यातच मुंबईहून लादलेले पालकमंत्री रवींद्र वायकर, ही त्यांची आणखी एक दुखरी नस होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांची ही दोन्ही दु:खे एकाच फटक्यात दूर केली आहेत.   विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेमध्ये प्रवेश केलेले जिल्ह्याततील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आमदार भास्कर जाधव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याच्या वावडय़ा उठवल्या जात होत्या. राजकीय कारकिर्दीची सुरूवात सेनेपासून केलल्या जाधवांची ती पुण्याई आता कामी येण्याची शक्यता नव्हती. शिवाय, सामंतांनी त्यांच्या आधी पाच वर्षे सेनेमध्ये प्रवेश करून अतिशय कमी काळात पक्षाच्या उपनेतेपदापर्यंत पोचण्याची किमया साधली आहे. जाधवांप्रमाणे मंत्रिपदाचा पूर्वानुभव त्यांनाही आहेच. त्यामुळे युतीचे सरकार येवो, किंवा महाविकास आघाडीचे, सामंतांचे मंत्रिपद निश्चित होते.

सिंधुदुर्गमध्ये परिस्थिती उलट

शेजारच्या सिंधुदुर्गात मात्र नेमकी उलटी परिास्थिती झाली आहे.  सामंतांप्रमाणेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या दीपक केसरकरांनी सेनेकडून पुन्हा आमदारकी  मिळवत संवेदनशील अशा गृह खात्याचे राज्यमंत्रिपदही पटकावले. पण त्यानंतरच्या पाच वर्षांत शिवसैनिकांना बळ देऊन संघटन मजबूत करण्यात ते अपयशी ठरले. पक्षाच्या दृष्टीने क्रमांक एकचा शत्रू असलेले भाजपाचे खासदार नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश यांना केसरकर वेसण घालू शकले नाहीतच, उलट पक्षाचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांच्याबरोबर गटा-तटाचे राजकारण करत बसले. त्यामुळे पक्षाचे सचिव व स्थानिक खासदार विनायक राऊत यांची त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली. हे सारे कमी होते म्हणून की काय, गेल्या रविवारी झालेल्या सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा राणेप्रणित भाजपाच्या संजू परब यांच्याकडून झालेला पराभव ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:44 am

Web Title: shivsena minister mla akp 94
Next Stories
1 गडाख, तनपुरे घराण्यात प्रथमच मंत्रिपद!
2 भाजपमध्ये असतानाही विखे विरुद्ध सारे असाच सामना
3 पाच जहाल नक्षलवाद्यांची शरणागती
Just Now!
X