साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आमदारांना सवाल करणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्याकडून एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेदरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर शिवसेनेचे आमदार शेतकऱ्यावर दादागिरी करीत असल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान या प्रकरणानंतर संदीपान भुमरे यांनी आपली काही चूक नसल्याचे म्हटले आहे. या शेतकऱ्याने सर्वसाधारण सभेत सवाल विचारला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठवाड्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात या शेतकऱ्याने अपशब्द वापरले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्याला मारहाण केली, असे सष्टीकरण संदीपान भुमरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिले. लोकप्रतिनिधींसमोर असा प्रकार घडणे उचित नसला तरी संबंधित शेतकऱ्याने केलेले कृत्यही अभिप्रेत नसल्याचे सांगत संदीपान भुमरे यांनी झालेला प्रकार चुकीचा नसल्याचे म्हटले.