X
Advertisement

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” शिवसेना आमदाराच्या टीकेमुळे वाद पेटण्याची चिन्हं

"एवढं पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे"

उजणी धरणातील पाण्यावरुन राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असताना आता तर थेट शिवसेना आमदारानेच ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र विरोध केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्यास मान्यता मिळालेली आहे. उजनी धरणातील शंभर टक्के पाणी वाटप झाले आहे. तरीही पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

उजनीच्या पाण्यावरून सोलापूर – पुणे जिल्ह्यात वाद

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत केलंआहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर हालगी नाद आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनीदेखील विरोध दर्शत अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार रहावे असा इशारा ठाकरे सरकारला दिला.

शरद पवारांवर टीका
“राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आह हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला,” असा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे.

 

“उजनी धरणातून शरद पवारांनी बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काही यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं,” अशी टीका शहाजी पाटील यांनी केली आहे.

21
READ IN APP
X