महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज गोरेगावमध्ये पहिलं राजव्यापी महाअधिवेशन होतं आहे. या अधिवेशनाला मनसेचे राज्यभरातून कार्यकर्ते दाखल झाले आहेत. वेगवेगळे ठराव या अधिवेशनामध्ये मंजूर होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसेकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक मंत्र्याच्या कारभारावर नजर ठेवण्याचे काम ही शॅडो कॅबिनेट करेल.

मनसेने शॅडो कॅबिनेटच्या स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने पलटवार केला आहे. टोल नाक्यावर मनसेने शेडो कॅबिनेट बसवली होती. त्याचं काय झालं? असा सवाल शिवसेनेचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

काही वर्षांपूर्वी मनसेने टोल नाक्याचे आंदोलन हाती घेतले होते. मनसैनिकांनी स्वत: टोल नाक्यावर गाडया मोजल्या होत्या. मनसेच्या या आंदोलनामुळे काही टोल नाकेही बंद झाले. पण मनसेच्या या आंदोलनात सेंटिग झाल्याचेही नंतर आरोप झाले होते. त्यामुळे वैभव नाईक यांनी टोल नाक्यावर मनसेने शेडो कॅबिनेट बसवली होती. त्याचं काय झालं? असा सवाल केला आहे.

राज ठाकरे यांच्याहस्ते आज शिवमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण झाले. झेंडयातील भगव्या रंगामुळे मनसेची भविष्यातील वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने होईल अशी चिन्हे आहेत. असे झाल्यास शिवसेनेचे महत्व कमी होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेकडून आतापासूनच मनसेवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली आहे. काल अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला जातील अशी घोषणा करण्यात आली.