पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. ५ मे रोजी भाजपाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ट्विटरला भाजपा नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीदेखील केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाच्या आंदोलनावरुन टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान भाजपाने करोनासंबंधित नियमांचं पालन करुन ५ मे रोजी देशव्यापी आंदोलन केलं जाईल असं जाहीर केलं आहे.

प्रियंका चतुर्वैदी यांनी भाजपाच्या नियोजित आंदोलनावरुन ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. देशाने अजून करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव पाहिलेला नाही, त्यामुळे भाजपानुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे. नाही का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा ४ आणि ५ मे रोजी पश्चिम बंगालचा दौरा करणार असून पक्ष कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हुगली जिल्ह्यात पक्ष कार्यालयाला आग लावली तसंच ममता बॅनर्जींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा भाजपाचा आरोप आहे. तसंच काही कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचाही आरोप भाजपाने केला आहे. तृणमूलने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

बंगालच्या राज्यपालांनी राज्यात सुरु असलेल्या हिंसाचार प्रकरणी डीजीपींना समन्स बजावलं असून अहवाल मागवला आहे.