भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं सांगत युती तुटण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. “मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान अमित शाह यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“हे काय ते पहिल्यांदाच बोललेले नाहीत. यापूर्वीसुद्धा बोलले आहेत. त्यात एवढं रहस्यमय आणि गोपनीय काय? त्यांना वाटतं नाही दिला, आम्हाला वाटतं दिला. आम्हाला वाटतं फसवलं, शब्द पाळला नाही. आम्ही आमच्या मार्गाने गेलो, त्यात यशस्वीदेखील झालो. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, सरकार आहे. महाराष्ट्रात जे घडतंय त्याचे पडसाद देशभरात उमटत आहे. ठीक आहे वैफल्य असतं. इतके प्रयत्न करुनही सरकार आम्हाला पाडता येत नाही याचं राजकारणात अनेकदा वैफल्य येत असतं. आमचा मुख्यमंत्री बनत नाही. ही तडफड असते. केंद्रात आमचं सरकार आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग असूनही आम्ही सरकार आणू शकलो नाही. काळोखात लपून छपून प्रयत्न केला. तेदेखील पडलं. यातून जे वैफल्य येतं त्यातून अशा उद्धोषणा होत असतात,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

…तर आज शिवसेनाच उरली नसती; अमित शाह यांचा घणाघात

“शरद पवारांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे विनोद, मनोरंजन यादृष्टीने त्याकडे पहायला पाहिजे. गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या मेडिकल कॉलेजचं अमित शाह यांच्या हस्ते उद्धाटन झालं त्याचं उद्घाटन दोन वर्षांपूर्वी शऱद पवार यांनीदेखील केलं होतं असं समजत आहे. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमात अजून काय होणार?,” असंही ते म्हणाल आहेत.

“बंद खोलीत तुम्हीच आलाच मातोश्रीवर, आम्ही तर आमंत्रण दिलं नव्हतं. तुम्हीच युती करण्यासाठी आला होता. बाळासाहेबांची खोली म्हणजे बंद खोली नाही, आमच्यासाठी ते मंदिर आहे. तिथे भाजपाचे अनेक लोक यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेऊन गेले आहेत. अडचणीत सापडलेल्या अनेक भाजपा नेत्यांची सुटका केली आहे. असे अनेक प्रकार आम्ही पाहिले आहेत. अनेकजण सर्वोच्च पदावर असले तरी या राजकीय घडमोडी इतरांपेक्षा जास्त पाहिल्या आहेत,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

“जर आंदोलन हायजॅक होत आहे असं वाटत असेल तर चार शेतकरी नेत्यांना बोलवा आणि थेट चर्चा करा. तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेणार की नाही? संसदेत भाषण केलं, बाहेर भाषण केलं पण निष्पन्न काय झालं?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“देशाच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचा आदर राहिला पाहिजे. राजकीय मतभेद एका बाजूला, पंतप्रधान सांगत आहेत तेव्हा त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण पंतप्रधानांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, शेतकरी अज्ञान आहेत. त्यांना त्यांची जमीन, पीक, एमएसपी यापलीकडे काही माहिती नाही. तुमही सगळे ज्ञानदेव आहात, तुम्ही भिंत चालवू शकता….भिंत चालवा आणि गाझीपूरला चला,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

“असे अनेक साधर्म्य वाटणारे शब्द भाजपाच्या वतीने ट्विट करणाऱ्या लोकांच्या ट्विटमध्ये असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं,” असा सल्ला संजय राऊत यांनी अनिल देशमुखांच्या चौकशी करणार असल्याच्या वक्तव्यावर दिला आहे. “परदेशातील एका व्यक्तीने पाठिंबा दिला म्हणून तीळपापड होण्याची गरज नाही. आपणदेखील ट्रम्पना पाठिंबा दिला होता. गरज होती का? आपण नेहमी परदेशातील कोसळणाऱ्या ताऱ्यांना पाठिंबा देतो. नमस्ते ट्रम्पशी काय संबंध? आपण हस्तक्षेप केलेला चालतो का? एखाद्या परदेशी व्यक्तीने ट्विट केल्यानंतर इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असंही ते म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला आदर आहे. देशानं त्यांच्याविषयी आदर ठेवला पाहिजे. त्यांच्या काही भूमिका पटत नसतील, त्यावर आपण टीका करतो…पण आम्ही कधीही पंतप्रधानपदाची आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होईल अशी टीका करणार नाही. मोदींनी सर्व गोष्टी खिलाडू वृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत त्यातच लोकशाहीचं कल्य़ाण आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.