राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती असतानाच निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला असून आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला असून २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राची पुण्याई मोठी, म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला असल्याची प्रतिक्रिया दिली. तसंच केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल. महाराष्ट्राची पुण्याई मोठी, म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला. केंद्र सरकारचे आभार. सत्यमेव जयते!”.

राज्यपालांनी निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी  विनंती करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन बातचीत केली होती. यावेळी त्यांनी करोना संकट असताना राज्यात सरकार अस्थिर होणं योग्य नाही असं सांगत मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत २७ मेच्या आधी निवडणूक घेण्याची विनंती केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर दिल्लीत निवडणूक आयोगाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने २१ मे रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

विधान परिषदेची निवडणूक पार पाडणे शक्य नसल्यास उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घोषणा करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने दोनदा राज्यपालांना केली होती. मुख्यमंत्री पदासह कोणतेही मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत संबंधित मंत्र्याला विधिमंडळाचा सदस्य व्हावे लागते. त्यामुळे उद्धव यांना २७ मे पूर्वी विधिमंडळाच्या कुठल्या तरी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता.

वेळापत्रक असे..
निवडणुकीविषयीची अधिसूचना ४ मे रोजी काढण्यात येईल. ११ मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. १२ मे रोजी अर्जाची छाननी केली जाईल. १४ मे रोजी अर्ज मागे घेता येईल, तर २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.