शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणं दिसल्यास तात्काळ करोना चाचणी करावी”.

याआधी १ मार्चला सर्वात प्रथम श्रीकांत शिंदे यांना करोनाची लागण झाली होती. त्यावेळीही त्यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली होती.

आणखी वाचा- भाजपा नेते आशिष शेलार करोना पॉझिटिव्ह

ठाण्यात दररोज १०,००० चाचण्या
महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वाढलेला करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रश़ासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने शहरात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच दररोज सरासरी पाच ते सात हजार होणाऱ्या चाचण्यांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून दहा हजारांच्या पुढे गेली आहे. दीड महिन्यापूर्वी एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आत होते. मात्र आता हे प्रमाण ७ टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून येते.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ९८ हजार ६६४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० हजार ६२८ (८२ टक्के) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १ हजार ५३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १६ हजार ५७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ८० टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये दररोज सरासरी १३०० ते १७०० आढळून येत आहेत.