नगर जिल्ह्यतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शिवसेनेबरोबर आघाडी करून सरकार बनविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एवढेच नव्हे तर सत्तेत सहभागी व्हावे, असाही आग्रह धरला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटली. आता शिवसेना व काँग्रेस—राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. जिल्ह्यतील बहुतेक आमदारांनी सत्तास्थापनेपासून भाजपाला दूर ठेवावे. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करावे. तसेच सत्तेत सहभागी व्हावे, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता.

जिल्ह्यत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व लहू कानडे हे दोघेच काँग्रेसचे आमदार आहेत. दोघेही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावे या विचाराचे होते. त्यांनी पक्षाच्या श्रेष्ठींकडेही भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, नीलेश लंके, संग्राम जगताप, प्राजक्त तनपुरे या आमदारांनीही भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊ  नये म्हणून भूमिका मांडली. लंके, जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र ते पराभूत झाले. जिल्ह्यत राष्ट्रवादीच्या बहुतेक उमेदवारांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. भाजप हाच त्यांचा प्रमुख विरोधक पक्ष आहे. पारनेरमध्ये भाजप नाही. संग्राम जगताप व नीलेश लंके वगळता सेनेबरोबर युती केल्याने अन्य आमदारांना फायदाच होणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

नगरच्या राजकारणात माजी मंत्री राधाकृष्ण विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड हे प्रभावशाली भाजपाचे नेते आहेत. विखे हे निवडणुकीत विजयी झाले. तरी अन्य नेते पराभूत झाले आहेत. आता विखे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे हे तीनच आमदार भाजपाचे आहेत. तर शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे आमदार शंकर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. गडाख यांच्या मतदारसंघात प्रमुख विरोधक मुरकुटे हे भाजपाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यत सत्तेतून भाजपाला दूर ठेवण्याच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. एकूणच नगरच्या राजकारणात आता भाजप विरोधात काँग्रेस—राष्ट्रवादी असा संघर्ष सुरु होण्याची चिन्हे आहेत.