News Flash

अमित घोडा यांची नाटय़मयरित्या माघार!

पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०१६मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अमित घोडा शिवसेनेतर्फे निवडून आले होते.

(अमित घोडा यांचं संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अमित घोडा यांना आघाडीतर्फे पालघर विधानसभेची उमेदवारी मिळाली. मात्र घोडा यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज नाटय़मयरित्या मागे घेतला. या सर्व प्रकारात घोडा कुटुंबीयांवर शिवसेनेच्या दबावतंत्राचे बळी पडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०१६मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अमित घोडा शिवसेनेतर्फे निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत पालघर विधानसभेसाठी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्यानंतर नाराज असलेल्या अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पालघरची उमेदवारी आघाडीतर्फे दाखल केली होती.

नामनिर्देशन अर्ज भरताना सोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये अमित घोडा यांनी पाच वर्षांचे उत्पन्नाचे विवरण भरले नसल्याने तसेच आमदार निवासमधील थकबाकी नसलेल्या प्रमाणपत्राबाबत शिवसेनेच्या उमेदवारांनी छाननीदरम्यान आक्षेप नोंदवले होते. शिवसेना आपल्याविरुद्ध न्यायालयात दाद मागेल या अपेक्षेने याबाबत ६ ऑक्टोबर रोजी वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी डहाणूमध्ये असताना दुपारपासून त्यांचा भ्रमणध्वनी अचानकपणे बंद झाला. तसेच त्यांचे स्विय सहाय्यक आणि त्यांच्या भावाचा ६ ऑक्टोबर रोजी दिवसभरात संपर्क होऊ  शकला नसल्याने अमित घोडा यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ताब्यात घेतल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे होऊ  लागले.

रविवारपासून संपर्कात नसलेले अमित घोडा सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालघर तहसील कार्यालय आमदार रवींद्र फाटक यांच्यासमवेत अवतरले आणि त्यांनी नाटय़मयरित्या आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. पालघरची जागा आपल्यासाठी सोडणार असल्याचे कारण सांगत आपल्याला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने तसेच याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावरून प्रतिसाद मिळत नसल्याने आपण शिवसेनेत पुन्हा जात असल्याचे अमित घोडा यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांच्या पालघर येथील संयुक्त सभेत अमित घोडा यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. अमित घोडा काही तासांसाठी दुसऱ्या पक्षात गेल्याचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर अमित घोडा सेनेत परत आल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

प्रशासनाचे सहकार्य?

नामनिर्देशन पत्र भरण्याच्या कालावधीत पालघर येथील तहसील कार्यालयाच्या १०० मीटर परिसराचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही याच पद्धतीने रस्ता बंद ठेवणे अपेक्षित होते. मात्र अमित घोडा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आले असता प्रशासनाने सोमवारी तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावरील वाहतूक बंद केलीच नाही. परिणामी रवींद्र फाटक यांच्या गाडीमधून आलेले अमित घोडा यांना थेट तहसील कार्यालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचता आले.

..अमित घोडा यांनी स्वत:हून ३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांना पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली होती. उमेदवारी दाखल करताना आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये धडकी भरली. शिवसेनेतील काही मंडळीने अमित घोडा व त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला आणि प्रचारादरम्यान त्यांच्यावर किंवा त्यांच्या घरावर हल्ला होण्याचे संकेत दिले. या धमकावणीला घाबरून दहशतीच्या वातावरणाखाली अमित घोडा यांनी नाइलाजाने उमेदवारी मागे घेतली आहे. – अनिल गावड, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर जिल्हा.

राष्ट्रवादीकडून आरोप

अमित घोडा हे डहाणू येथे प्रवास करत असताना अचानकपणे काही गाडय़ांच्या ताफ्यांनी त्यांना वेढले आणि त्यांना रविवार दुपारपासून अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इतर पक्षांवर दहशतीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने दादागिरी व दडपशाहीचा मार्ग अवलंबण्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे होऊ  लागले आहेत.

तीन वर्षांपासून आपण करत असलेली जनतेची सेवा यापुढेही करायची होती म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागावाटपाबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नसल्याने मी माघार घेतली आहे. शिवसेनेत पुन्हा प्रवेश घेण्यासाठी माझ्यावर कोणताही प्रकारचा दबाव नाही.

– अमित घोडा,माजी आमदार, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:24 am

Web Title: shivsena ncp akp 94
Next Stories
1 अधिकारी आले, प्रदूषण घटले!
2 कांद्याच्या साठवणुकीतून महागाईवर मात
3 मासेमारी बोटीला जहाजाची धडक
Just Now!
X