महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागला आहे. गावागावात टॅंकरची सोय केलेली नाही आणि जलयुक्त शिवार योजनेची जाहिरातबाजी तर अशी केली आहे की राज्याबाहेरील लोकांना वाटतंय महाराष्ट्र जलमय आहे. यांच्या राज्यात महाराष्ट्राची प्रगती पाण्याखालीच गेली आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्य्यातील 18 वी सभा आज जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर आसूड घेऊन फिरत होते. कर्जमाफी देता की जाता असं म्हणत होते. आता लाचारी पत्करून सरकारमध्ये असल्याने त्यांना काही देता पण येत नाही आणि जाता पण येत नाही अशा शब्दात मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले म्हणतात. आंदोलनं चिरडण्यासाठी शेतकऱ्यांना पायाखाली गोळी मारायला हवी होती अशी वाच्यता करतात. आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवाच, नाही लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली तर सांगा,” असा इशारा मुंडे यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांना दिला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, फोजिया खान, आमदार बाबजानी दुराणी आदी उपस्थित होते.