ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपाला गळती लागणार असल्याची चर्चा होत आहे. अशात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर ते आज निश्चित झालं. या निर्णयाचं शिवसेनेच नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना स्वागत केलं आहे. याचबरोबर अर्जून खोतकर यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं आहे.
आणखी वाचा- एकनाथ खडसेंपाठोपाठ मुलीचाही भाजपाला रामराम, निर्धार व्यक्त करत म्हणाल्या…
“भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. मागच्या पाच वर्षात भाजपाने मेगा भरती केली. आता भाजपाला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते आज राष्ट्रवादी पक्षात जात आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आजही भारतीय जनता पक्षात अनेक प्रमुख नेते नाराज आहेत . त्यांनी त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे. पंकजा मुंडे जर आमच्या पक्षात आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत. मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच काय आणखी कोणी भाजपा नेता, जर आमच्या पक्षात आला तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू,” असं अर्जून खोतकर म्हणाले.
आणखी वाचा- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ती मागणी केली असती तर राजकीय संन्यास घेतला असता : खडसे
एकनाथ खडसे यांच्याबरोबरच पंकजा मुंडे या काही महिन्यांपासून नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षापासून काहीसा दूरावा साधला होता. विधान परिषदेवर डावण्यात आल्यानंही त्यांची नाराजी दिसून आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 6:17 pm