News Flash

मध्यावधी निवडणूक झाल्यास शिवसैनिक वणव्याप्रमाणे पेटून उठेल: उद्धव ठाकरे

हिंमत असेल तर निवडणूक घेऊ दाखवावी, भाजपला आव्हान

मध्यावधी निवडणूक झाल्यास शिवसैनिक वणव्याप्रमाणे पेटून उठेल: उद्धव ठाकरे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली असून या निवडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपतीपदावर मतांचे राजकारण नव्हे तर देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपला पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा करता येत नसेल तर समान नागरी कायदा कसा करणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

शिवसेनेचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्या (मंगळवारी) शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजपच्या नावावर चर्चा करु असे त्यांनी सांगितले. सीमा अशांत आहे, काश्मीर पेटलंय, गोरखा मुक्तीचे आंदोलन पुन्हा पेटले असून अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपला पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. पाठीत वार झाल्याने रक्तबंबाळ होऊनदेखील संकटाच्या प्रसंगी रक्तदान करतो तोच खरा शिवसैनिक असल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

मध्यावधी निवडणुकीची आम्हाला पर्वा नाही. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याची चिंता मला जास्त आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य वाचवण्याची शिवसेनेची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. मध्यावधी निवडणूक झाल्यास शिवसैनिक ठिणगी नव्हे तर वणव्याप्रमाणे पेटून उठेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन  दाखवावी. शिवरायांच्या भूमीत तुम्हाला गाडून तुमच्याच छातीवर भगवा फडकावून दाखवू असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले आहे. दरवेळी आपला विजयच होईल असा गैरसमज कोणी करु नये. आता काळ बदलला असून खचलेला शेतकरी रस्त्यावर उतरलाय अशी आठवणही त्यांनी भाजपला करुन दिली.

भारत कृषीप्रधान देश असून शिवसेना शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत सरकारला सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. बेळगावमध्ये कर्नाटक सरकार अत्याचार करत आहे. पण यावर कोणीही बोलत नाही. फक्त शिवसेनाच याविषयावर बोलतो. मराठी माणसाच्या मागे फक्त शिवसेना उभी राहिली असे त्यांनी सांगितले. बेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटक सरकारने मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत बघू नये असा इशाराही त्यांनी दिला. सर्वसामान्य हिंदू आणि मराठी माणसाच्या मागे उभे राहताना मी सत्तेची पर्वा करणार नाही असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2017 7:42 pm

Web Title: shivsena party chief uddhav thackeray speech 51 foundation day slams bjp ramnath kovind farmer issue
Next Stories
1 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार जाहीर
2 दलित समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतिकारी: आठवले
3 १० हजाराच्या कर्जाचे तुकडे फेकणं बंद करा; शेतकरी नेत्यांचा संताप
Just Now!
X