06 July 2020

News Flash

आमची युती पुणेकरांशी, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

पुण्यामध्ये भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची युती होणार की नाही, हे आता सांगू शकत नाही. पण शिवसेना लढणार आणि जिंकणार, कारण आमची युती पुणेकरांशी आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मित्रपक्ष भाजपवर टीका केली. पुण्यामध्ये भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. पण ते आतापर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. आता ते स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवणर आणि राज्यासोबतच पुण्यातही भगवा फडकवणार, असेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे सातारा जिल्ह्यातील सोळशीमध्ये शिवतेज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेना लढणार आणि जिंकणार, असा मला विश्वास आहे. लोकांच्या प्रश्नांशी आमची बांधिलकी आहे. आम्ही खोटं बोलून कधीही मतं मागितली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रीय पक्षांना करता आले नाही, ते शिवसेनेने करून दाखवले आहे. चार महिन्यांमध्ये आम्ही ६३ आमदार निवडून आणले. काही ठिकाणी आमचे आमदार अगदी थोड्या मतांनी पडले आहेत. या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही आम्ही शिवसेनेचे खरे महत्त्व दाखवून दिले.
धरमशाला येथील भारत, पाकिस्तान सामन्यासाठी सुरक्षा पुरविण्यास नकार देणारे हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. सध्या देश कोण चालवते आहे केंद्र सरकार की क्रिकेट बोर्ड, असा प्रश्न आपल्याला पडला आहे, असे त्यांनी क्रिकेटला सुरक्षाव्यवस्था पुरविण्याच्या मुद्द्यावरून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 7:20 pm

Web Title: shivsena party chief uddhav thackerays speech in solshi
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 ग्लायडरचे हडपसरजवळ इमर्जन्सी लॅंडिंग, वैमानिक जखमी
2 प्रसिध्दीच्या हव्यासापोटी तृप्ती देसाई यांचे आंदोलन
3 ‘लक्ष्य २०१७’ साठी स्वयंघोषित इच्छुकांकडून वर्षभर आधीच सामाजिक उपक्रमांचा सपाटा
Just Now!
X