टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे घातले. तसंच त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांनी कारवाईवर संताप व्यक्त करत ईडीने धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही असं म्हटलं आहे. तसंच फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, अटक करायची असेल तर…,” संजय राऊतांचं जाहीर आव्हान

ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. “या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी आहे,” असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु,” प्रताप सरनाईकांवरील कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

“ईडीच्या लोकांनी माझं ऑफिस, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची रितसर कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. त्यातही त्यांचं समाधान झालं नाही. ज्यावेळी ते मला बोलावलील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. मी त्यांच्या प्रश्नानां उत्तर देण्यात समर्थ आहे,” असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- विरोधी पक्ष संपविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

“विहंगसोबत फोनवरुन बोलणं झालं. ईडीने त्याला अनेक व्यवसायासंबंधी प्रश्न विचारले. टॉप्स नावाची एक एजन्सी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मालकाचे आणि आपले काही आर्थिक संबंध, व्यवहार आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. एक सुरक्षा एजन्सी म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या कार्यक्रमात त्यांचे सुरक्षारक्षक ठेवत असतो. त्याचे रितसर पैसेही दिले आहेत. माहिती विचारली तर देऊ,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“दुबई, मकाऊ, अमेरिकेत काही व्यवसाय आहेत का हेदेखील विचारलं. त्यालाही विहंगने उत्तर दिलं. व्यवसायात वापरण्यात आलेले क्रेडिट कार्ड इन्कम टॅक्समध्ये दाखवलं आहे. याची रितसर माहिती आहे. ती त्यांना मिळाली असेल म्हणून चौकशी करत असतील,” असं प्रताप सरनाईकांचं म्हणणं आहे.

“आमच्या घरी, ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाष्टा केला. चार पाच वेळा चहा घेतला, जेवण केलं. एखाद्या घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईकांना चांगलं माहिती आहे. माझी पत्नी आणि मुलांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला,” अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena pratap sarnaik on ed raid to his office house sgy
First published on: 25-11-2020 at 08:57 IST