शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून शिवसेनेच्यावतीने एक आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार असल्याची माहिती युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्य़ातील विविध विकासकामांची पाहणी त्यांनी केली. तसेच, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनाही त्यांनी शिवसेनेच्यावतीने मदत दिली. अशी पक्षीय मदत देण्याऐवजी धोरणातच बदल का केले जात नाहीत, असे विचारले असता,‘‘ ते तर करूच, शिवाय इतरही मदत करू,’’ असे मोघम उत्तर त्यांनी दिले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे आदी उपस्थित होते.
 शहरातील रस्त्यांच्या खड्डय़ांवरून शिवसेनेवर टीका होत असल्याने युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शहरातील क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या सिमेंट रस्त्यांची पाहणी केली. गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे काम करत आहे. त्याची माहिती घेता यावी म्हणून औरंगाबादला आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसही त्यांनी हजेरी लावली. कन्नड तालुक्यातील चापानेर येथील बाळू नारायण पवार आणि औराळी येथील निवृत्ती शंकर गायकवाड या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत आदित्य ठाकरे यांनी दिली. छायाचित्र प्रदर्शनातून मिळालेल्या ५ कोटी रुपयांची रक्कमही शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आली आहे. युवा सेनेच्यावतीनेही काही मदत देता येऊ शकते का, हे आम्ही पाहू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.