नोटबंदी एक क्षणात झाली तसे राममंदिर का होऊ शकत नाही ? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबईतील खड्डे, नाणार प्रकल्प आणि महाविद्यालयात भगवदगीता वाटप या विषयांवर आपली परखड मते मांडली.

भगवदगीता मला चाळायची आहे ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत आहे असा भाजपला तिरकस टोला त्यांनी लगावला. परीक्षा निकाल वेळेवर न लागणे, पेपर फुटी प्रकार हे सगळं झाकण्यासाठी भगवदगीतेचा विषय काढण्यात आला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. विद्यापीठाचा गोंधळ टाळण्यासाठी भगवदगीता वाटपाचा विषय काढण्यात आला. त्यापेक्षा निकाला वेळेवर लावा असे उद्धव म्हणाले. राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द करणे हे सगळं व्हायला हवे त्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या ? असा प्रश्न त्यांनी केला.

मुंबई आणि कल्याणमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.पण ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही.तर सर्वांची असून राज्य सरकारची देखील जबाबदारी असल्याची भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असून तुम्ही पाच वर्ष भांडत आहात.तर आगामी निवडणुकीत एकत्र येणार का या प्रश्नावर ते म्हणाले की,आम्ही मागील पाच वर्षापासून भाजपशी जनतेच्या प्रश्नावर भांडत आहोत. पण आगामी निवडणुकीत एकत्र येऊ किंवा नाही माहीत हे नाही. हा निर्णय एक जण घेऊ शकत नाही. अनेक जण घेतात असे सांगत ते पुढे म्हणाले की,जनतेने त्यांना जी मते दिली. त्याचा अपेक्षा भंग झाला आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.

नाणार प्रकल्पावर तुमची या पुढील काळात भूमिका काय राहणार त्यावर ते म्हणाले की, फळबागा उध्वस्त होणार असून पर्यावरणाचा विनाश होणार आहे.हा प्रकल्प विध्वंसक असल्याने त्याला शिवसेनेचा कायम विरोध असणार आहे.तसेच नाणार प्रकल्प हा विषय संपलाय तरी मुख्यमंत्री तो प्रश्न का जिवंत का करत आहेत.असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

२०१९ पूर्वी भाजप राममंदिर उभारणार अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.त्या प्रश्नावर ते म्हणाले की, विकासाचा मुद्दा बाजूला करून आता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून राममंदिर उभारले जाणार असा मुद्दा पुढे आणला जात आहे.राममंदिर झालेच पाहिजे पण ते कधी होणार हे त्यांच्याकडून सांगितले जात नसून राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे सगळं व्हायला हवे. त्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तुमच्याकडे बहुमत असताना हे सर्व निर्णय घेतले पाहिजे असे ते म्हणाले.