विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या राज्यातील प्रचाराचा शुभारंभ लोहा येथून होणार आहे. दि. ६ सप्टेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती शिवसेनेत दाखल झालेल्या लोहा-कंधारचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
मातोश्रीवर ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी प्रथमच चिखलीकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, हेमंत पाटील, डॉ. मनोज भंडारी, सुरेश राठोड आदी उपस्थित होते. लोहा येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत इतर पक्षांतील मान्यवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा चिखलीकर यांनी केला.
काँग्रेसमध्ये न्याय न मिळाल्याने लोहा-कंधारमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढलो. काही लोक लोकभारतीसंदर्भाने माझा प्रचार करीत असले, तरी मी लोकभारती पक्षात कधीच गेलो नव्हतो. केवळ लोहा नगर परिषदेत त्या पक्षाचे चिन्ह घेतले होते, असा खुलासा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंदात गेलो. परंतु तेथे मला गुदमरल्यासारखे झाले. अजित पवारांनी प्रेम दिले. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली नव्हती, तरीही कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत मोकळा श्वास घेता येईल, असेही चिखलीकर म्हणाले.
नांदेड जिल्हय़ात विधानसभेच्या सर्व जागांवर महायुतीला यश मिळेल, असा दावा करताना चिखलीकर यांनी कोणत्याही मतदारसंघाची जबाबदारी घेतली नाही. पक्ष देईल तो आदेश मी पाळीन, असे स्पष्ट केले.
चिखलीकरांचे राजकीय वर्तुळ पूर्ण!
काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय पदार्पण, मग अपक्षाचा झेंडा फडकावत विधानसभेत झेप, पुढच्या टप्प्यात लोकभारती.. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश व आता शिवसेना.. मन्याडचा वाघ मानले जाणाऱ्या प्रतापराव चिखलीकर यांनी आपल्या पाव शतकाच्या राजकीय जीवनातील वर्तुळ पूर्ण केले. वसंतनगर भागातील चिखलीकर निवासस्थानाचा परिसर शुक्रवारी भगव्या उपरण्यातील शिवसैनिक, कार्यकर्त्यांनी गजबजला होता. ‘जय भवानी..’, ‘आऽवाज कोणाचा..’ घोषणांचा गजर सुरू होता. चार महिन्यांपूर्वी याच निवासात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सकाळच्या न्याहारीस आले होते. तेव्हाचे वातावरण, गर्दीतले चेहरे व आताची गर्दी यातला बदल ठळक जाणवत होता. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण हे चिखलीकर परिवाराचे श्रद्धास्थान. त्यांच्यासोबत अशोक चव्हाण यांना या परिवारात मान मिळाला; पण प्रतापरावांनी विलासरावांना राजकीय गुरू मानले. चिखलीकरांच्या घरातल्या भिंतीवर शरद पवार, अजित पवार यांच्या तसबिरींनाही अलीकडच्या दीड-दोन वर्षांत स्थान मिळाले. दिवंगत व हयात नेते गुण्यागोविंदाने एकत्र दिसत असताना शुक्रवारपासून मात्र माहोल बदलला. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या तसबिरी कधी विराजमान होतात, अशी आता उत्सुकता आहे.