लोकसभेतील पराभवानंतर शिवसेनेतील अंतर्गत दुफळी थांबण्याऐवजी वाढतच असून, सेनेतील घरचे भांडण आता फेसबुकमुळे चव्हाटय़ावर आले आहे. जिल्ह्य़ात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
हिंगोली लोकसभा निवडणुकीत सेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा अवघ्या १ हजार ६३२ अशा काठावरच्या मतांनी पराभव झाला. मात्र, केंद्रात आलेली सत्ता लक्षात घेता हा निसटता पराभव शिवसनिकांच्या जिव्हारी लागला. त्यातूनच गद्दारी कोणी केली, याची चर्चा सुरू झाली. या गद्दारीबाबत शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांवर तोंडसुख घेऊ लागले आहेत. परंतु आतापर्यंत पेल्यातले असणारे हे भांडण आता मात्र फेसबुकच्या दारात गेल्याने तो चच्रेचा विषय झाला आहे.
सेनेचे वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघांत पूर्वी निवडून आलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, तसेच गजानन घुगे यांचे समर्थक मानले जाणारे सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, विभागप्रमुख बालाजी बोंढारे पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत देशमुख, माजी तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी, सेनेचे ज्येष्ठ कार्यकत्रे सखाराम उबाळे यांनी ३ दिवसांपूर्वी प्रसिद्धिपत्रक काढून वानखेडे व समर्थकांनीच पक्षाशी गद्दारी केली. त्यामुळे नरेंद्र मोदींची लाट असताना िहगोलीत शिवसेनेला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असा आरोप पत्रकात केला. सेनेशी काही संबंध नसलेल्या राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजी माने यांच्याकडे लोकसभा निवडणूक प्रचाराची सूत्रे देऊन वानखेडे गटाने निष्ठावंत सनिकांना प्रचारापासून दूर ठेवले. त्याचा वानखेडेंनाच फटका बसला. सेनेशी गद्दारी करून प्रथम काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्या माने यांनी सेनेत ढवळाढवळ करू नये, या साठी ‘विधवेने सवतेच्या कुंकवाची उठाठेवकरू नये’, या शब्दांत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता. या पाश्र्वभूमीवर आता सेनेचा वाद फेसबुकच्या दारात पोहोचला आहे. शिवसेना िहगोली या नावाने असलेल्या पानावर माजी मंत्री डॉ. मुंदडा यांचे छायाचित्र टाकून त्यावर ‘ही पाकिस्तानची औलाद’ असा उद्धार केला. मुंदडांनी काँग्रेसचे राजीव सातव यांच्याशी तडजोड करून काँग्रेसचा प्रचार केल्याचा आरोपही पत्रकात आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फेसबुकवरून ही पोस्ट टॅग केली आहे. शिवसनिकांनी त्यास ‘लाइक’ करून मुंदडा यांच्याविरोधात टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत सेनेतील वाद आणखी किती रंगणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.