05 August 2020

News Flash

मुनगंटीवार यांना पडलेल्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील -शिवसेना

...हे करणार आहात का?; चंद्रकांत पाटलांना सवाल

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भूमिका मांडताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला होता. पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरून शिवसेनेनं मुनगंटीवारांना टोला लगावला आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे. ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील,” अशा शब्दात मुनगंटीवारांवर टीका करताना शिवसेनेनं शरद पवारांचं कौतूक केलं आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला पूर्णविराम दिला. त्याचवेळी भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. पुस्तकाच्या वादात छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे होते. मग शरद पवारांना जाणता राजा कसे म्हणता असं भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हा प्रश्न विचारण्याचा सल्ला शिवसेनेनं मुनगंटीवार यांना दिला आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे, ‘पवारांना जाणता राजा कसे म्हणता?’ हा प्रश्न त्यांनी श्री. नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडान्खडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील. पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्याने आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही. मधल्या काळात भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही ‘जाणते राजे’ अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे!,” अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.

…हे करणार आहात का?; चंद्रकांत पाटलांना सवाल

“चंद्रकांत पाटील यांनी या निमित्ताने वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? पाटलांचा प्रश्न निरर्थक आहे. शिवसेनेने सावरकरांच्या संदर्भात ठाम भूमिका नेहमीच घेतली. नव्हे, फक्त शिवसेनेनेच घेतली. केंद्रात भाजपचे सरकार आहे. वीर सावरकरांना तत्काळ ‘भारतरत्न’ द्यावे, राष्ट्रपुरुषांच्या नामावलीत वीर सावरकरांना समाविष्ट करावे व वीर सावरकरांवर जो घाणेरडे विधान करील त्यावर खटले दाखल करण्याचे फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाने काढावे. हे करणार आहात का? सावरकरांची तुलनाही शिवरायांशी करता येणार नाही. वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेने घेतलेल्या ठाम भूमिकेच्या आसपासही कोणी फिरकू शकले नाही. शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला व पेटून उठला. पंडित नेहरू असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 8:55 am

Web Title: shivsena replay to chandrakant patil over sharad pawar bmh 90
Next Stories
1 “येत कसा नाही आलाच पाहिजे”, नवरा अमेरिकेतून परत येत नसल्याने बायकोचं आंदोलन
2 “फुटकळ लेखकाला भाजपातून हाकलून का दिले नाही?”
3 सिंचन घोटाळा प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखल केले शपथपत्र
Just Now!
X