संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना पेपरदेखील वाचत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. दरम्यान नाना पटोले यांच्या या वक्तव्याला शिवसेनेने उत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने नाना पटोले यांना सामना संपादकीयमधून लगावला आहे.

शिवसेनेने काय म्हटलं आहे –
“काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही -नाना पटोले

“प. बंगालात पक्षाला खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

नाना पटोले काय बोलले होते –
“संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचं होतं ते अगोदरच सांगितलेलं आहे. त्यांचा सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलं आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं.” असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.