मुंबईला बॉम्बे नव्हे मुंबईच म्हटले पाहिजे अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी होती. बॉम्बेचा उल्लेख मुंबई करण्यासाठी शिवसेनेने अनेकदा आक्रमक पवित्रा सुद्धा घेतला. अखेर १९९५ साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर बॉम्बेचे मुंबई असे अधिकृत नामकरण झाले. पण आता शिवसेनेलाच मुंबई नावाचा विसर पडला का ? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.

MIDC च्या डायरीतच मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ करण्यात आला आहे. बॉम्बेचे नाव अधिकृत मुंबई झालेले शिवसेनेला माहीत नाही का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला आहे. सरकारमध्ये शिवसेनेकडे उद्योग खाते असून त्यांच्या अखत्यातारित एमआयडीसी येते. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उद्योग खात्याचे मंत्री आहेत.

शिवसेनेचा मराठीचा कळवळा फक्त दाखवण्यापुरताच आहे ? मराठीसाठी लढणाऱ्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना यावर आक्षेप नाही का ? असे प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारले आहेत. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या टि्वटमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई या तिघांनाही टॅग केले आहे.