आजच्या सामना अग्रलेखातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन निशाणा साधण्यात आला आहे. नाना पटोले हे मोकळय़ाढाकळय़ा स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना पटोले असं शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. याबद्दल आज माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस हा पक्ष सध्या उरलेला नाही. अनेक राज्यांतून काँग्रेसची पिछेहाट झाली आहे, असं शिवसेनेने आपल्या मुखपत्रातल्या अग्रलेखातून म्हटलं आहे. आणि इकडे तुम्ही स्वबळावर लढण्याची भाषा करत आहात, यावर प्रतिक्रिया काय असा सवाल विचारण्यात आला असता नाना पटोले म्हणाले, मी सामनाचा अग्रलेख वाचला आहे. त्यात संजय राऊतांनी स्पष्ट म्हटलं आहे की, नाना पटोलेंनीच महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी दिली आहे. अशी उभारी देशालाही मिळावी अशी अपेक्षा संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीय मधून व्यक्त केली आहे.

हेही वाचा – “शरद पवारांनी नाना पटोलेंना छोटा माणूस म्हणणं हीच….,” शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका

काँग्रेसच्या भविष्याबद्दल सांगताना नाना पटोले म्हणाले की, २०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बनणार म्हणजे बनणारच. कारण, आज देशामध्ये भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस आहे. भाजपाने केंद्रामध्ये बसून देश विकायला काढला आहे, देश विकला. लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. काही लोकांना तर असं वाटतं आहे की करोना परवडला पण ही महागाई परवडत नाही. असं लोक आता बोलू लागले आहेत. भाजपाने करोना आणि महागाई या दोन्हीचा संगम करुन आता देशातल्या लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे.

आणखी वाचा – “२०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार,” नाना पटोलेंचं मोठं विधान

नाना पटोले हे मोकळय़ाढाकळय़ा स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना पटोले असं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं आहे. नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गर्मी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले असंही शिवसेनेने संपादकीयमधून म्हटलं आहे.