बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला आहे. कंगनाच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“कंगना तरुण आहे, त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे. तरुणांचा राग मनात दाबला तर स्फोट होतो. राग व्यक्त करणं चांगल्या मानसिकतेचं दर्शन आहे. फक्त त्यात विकृती नको,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मुंबईत गुंडाराज! जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये; कंगनाचा ‘ट्विट’हल्ला

जुहू येथील कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे.

आणखी वाचा- “षंढासारखं गप्प बसणार नाही,” कंगना प्रकरणावरुन संजय राऊत आक्रमक

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एका सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक आहे. आम्हाला हे बाळकडू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांनी दिलं आहे. जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल, आमच्या नेत्यावर चिखलफेक करत असेल तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही काही षंढासारखे बसून राहणार नाही”.

“उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. मी महाराष्ट्राची भूमिका मांडली म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडली. व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करु नका, केली तर आम्ही उसळून उठू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.