News Flash

“आम्ही महाभारताचे योद्धे आहोत आणि माझं नाव संजय आहे”; राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे; संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान

तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे; संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान (Photo: PTI)

आम्ही महाभारताचे योद्धे आहोत आणि माझं नाव संजय आहे अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात मोडत नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत असंही ते म्हणाले आहेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेत्यांवर दबाव टाकून सत्तास्थापनेसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं.

“त्याला यश मिळेल असं वाटत नाही. आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात मोडत नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. शिवसेनेसोबत काम करता करता केस पांढरे झाले आहेत आणि परत काळे करत आहोत. आम्हाला सर्व माहिती असून फार तर तुरुंगात टाकाल. तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे. आम्ही महाभारताची जी उदाहरणं जी दिली आहेत त्यातील योद्धे आम्हीच आहोत. आणि माझं नाव संजय आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एमकेव गट

शिवसेनेत दोन गट आहेत का असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही”.

सरकार पाच वर्ष चालवण्यासाठी तिन्ही पक्ष बांधील

“प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा विस्तार करत असतो. आम्हीदेखील करत असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसही करेल. कोणी कशा पद्धतीने लढायचं यावर कोणतीही चर्चा झालेली नसून ती योग्य वेळी होईल. सरकार पाच वर्ष चालवायचं यासाठी तिन्ही पक्षांची बांधिलकी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि दिल्लीतील नेतेही नेहमी किमान समान कार्यक्रम सरकार चालवण्याचा मुख्य आधार असल्याचं सांगत असतात,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श“

मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सर्व जण आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार. कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे,” असं सांगत संजय राऊत यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला.

प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे होत असून शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत असा आरोप केला आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “मी सरकारमध्ये नाही, त्यामुळे त्याविषयी बोलू शकत नाही. पण ते शिवसेनेचे सन्माननीय सदस्य आणि आमदार आहेत. ते आणि त्यांचं कुटुंब त्रासात, अडचणीत आहे. अडचणींचं कारण त्यांनी पत्रात सांगितलं आहे. भाजपा केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देत असल्याचं त्यांना म्हटलं आहे. त्या त्रसातून सुटका करुन घेण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. ते त्यांचं मत आहे. पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सर्वाशी बोलून घेतली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असून विनाकारण होणाऱ्या त्रासाचा सामना कसा करावा यासाठी संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक त्यांच्या पाठीशी आहे”.

शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठीशी

“प्रताप सरनाईक हे आमदार आणि शिवसेनेच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. ते आणि त्यांचं कुटुंब त्रासात असून त्यांच्या मागे ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांना लावण्यात आलं आहे ते पाहता असं संकट कोणावरही येता कामा नये. पण या संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. गरज लागेल ती मदत केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“विनाकारण दिलेला त्रास काय असतो हे पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या लोकांनी तसंच महाराष्ट्रातही अनुभवला जात आहे. सत्ता गेली, जात आहे किंवा मिळत नाही म्हणून विनाकारण त्रास देत भारताच्या संस्कृतीला शोभत नाही आणि महाराष्ट्राला तर अजिबात नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 11:37 am

Web Title: shivsena sanjay raut bjp central agencies mahabharat pratap sarnaik sgy 87
Next Stories
1 मी इतकंच सांगेन; संभाजीराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधींना केलं आवाहन
2 शिवसेनेत गटबाजी असल्याच्या प्रश्नाला संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
3 शरद पवार दिल्लीसाठी रवाना; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग
Just Now!
X