भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला असून त्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना विरोध केलेला नाही याकडेही लक्ष वेधलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
“शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत बंद‘ला समर्थन देणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टीने वेळोवेळी मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना पाठिंबा दिला होता. बंदमध्ये सहभागी होण्याची या सर्व राजकीय पक्षांची दुटप्पी भूमिका असल्याचा,” आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आणखी वाचा- …तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

संजय राऊतांचं उत्तर –
“आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचं बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे. त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे,” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

आणखी वाचा- Bharat Bandh: संजय राऊतांचं थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आव्हान, म्हणाले…

“दबावात येण्याची गरज नाही. सरकारकडे डोकं नाही पण जर त्यांनी मनाने विचार केला तर या देशाच्या शेतकऱ्याचं ऐकलं पाहिजे. शेतकऱ्याचं ऐकलं तर संपूर्ण जग आपलं ऐकेल,” असंही ते म्हणाले आहेत. लोकांचा पाठिंबा शेतकऱ्यांना मिळत आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“मी संपूर्ण देशातून माहिती घेत होतो. जिथे भाजपाचं सरकार आहे तिथेही चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद मिळत आहे. कारण हा बंद राजकीय नाही तर भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तो स्वच्छेने, स्वंयफूर्तीने ज्याच्या कष्टाचं अन्न आपण खात आहोत त्याच्यासाठी आहे. जो शेतकरी, कष्टकरी शेतावर राबत आहे त्याचे काही प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल काही मतभेद असू शकतील. पण गेले १२ दिवस थंडी, वाऱ्याची, सरकारी दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातील नाही तर जगातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जगात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मोर्चे निघाले आहेत,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.