मुंबईसह राज्यातील अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असून, कोणाबरोबर युती करायची वा नाही याचा निर्णय वेळ येईल तेव्हा घेऊ, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात स्पष्ट केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी समाज अस्थिर असताना निवडणुका घेणे कितपत योग्य याचाही विचार झाला पाहिजे असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सहमती दर्शवली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्या टीकेलाही अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. करोनाचा बहाणा करून निवडणुका आणखी दोन वर्ष पुढे ढकलण्याचा व काही प्रभाग फोडण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

मनसे महापालिका निवडणुकांमध्ये ताकदीने उतरेल!

राज ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुकीसाठी घाई करु नये असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, “माझंही तेच म्हणणं आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे. अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे. जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता?”.

फडणवीसांच्या टीकेला उत्तर
“देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणं. लोकशाहीत ही टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी करोना संकटात महागाई, वादळ. मदत योजना यासंदर्भात बोललं पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.

“फडणवीसांचं दु:ख समजून घेतलं पाहिजे. माझ्यामुळे सत्ता गेल्याची वेदना आहे. मी त्यांचं दु:ख समजतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.