उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्या पाठिशी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौकशीतून काही निघेल असं वाटत नाही म्हणत राज ठाकरे यांची पाठराखण केली होती. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हजर झाले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईतील काही भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे , दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

“राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभं राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी”, असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ही नोटीस हे संकट नाही, एक प्रक्रिया आहे. काय निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरेंनी हे जाहीरपणे सांगितलं आहे”. तसंच ही परीक्षा असते, तटस्थपणे पाहायला हवं. आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे चौकशीसाठी सहकुटुंब पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्यनारायणाच्या पुजेला गेलेत का ? असा टोला मारला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सत्यनारायणाची असो की श्रावणाची पूजा…नसती उठाठेव नको. संकटसमयी कुटुंबसोबत असणं साहजिक आहे असं उत्तर दिलं आहे.