News Flash

राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; उद्धव ठाकरे दिलं उत्तर…

लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छित आहेत त्यांना कसं रोखणार ? - उद्धव ठाकरे

संग्रहित (PTI)

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी काही ठराविक महत्त्वाच्या व्यक्तींनाच निमंत्रण दिलं जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना संकटामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तुम्ही याचं ई-भूमिपूजन करु शकता असा सल्ला दिला आहे. सोबतच लाखो रामभक्त जे तिथे उपस्थित राहू इच्छित आहेत त्यांचं तुम्ही काय करणार आहात? अशी विचारणादेखील केली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर आपलं मत व्यक्त केलं.

“एक व्यक्ती म्हणून मी हो किंवा नाही उत्तर देऊ शकतो. राम मंदिराच्या लढ्यातील शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही राम मंदिरात गेलो होतो. १८ नोव्हेंबरला पहिल्यांदा मी राम मंदिरात गेलो होतो. जाताना शिवनेरीवरील एक मूठ माती नेली होती. त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड बस्त्यात होता. कोणी काही विषय काढत नसताना शिवसेनेनेच सुरुवात केली. जर उशीर लागत असेल तर कायदा करा, वटहुकूम काढा, काय वाट्टेल ते करा पण राम मंदिर बांधा अशी शिवसेनेची मागणी होती. त्याच्यासाठी आपण अयोध्येला गेलो. तुम्ही योगायोग किंवा काहीही म्हणा तो विषय वर्षभरात सुटला. सोबतच ज्या नोव्हेंबरमध्ये मी गेलो त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये तो प्रश्नही सुटला आणि मी मुख्यमंत्रीदेखील झालो. ही माझी श्रद्धा आहे. जर कोणाला अंधश्रद्धा वाटत असेल तर तो त्यांचा विषय आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“सध्या सगळीकडे करोनाचं थैमान आहे. मी जाणारच असं म्हणू शकतो…मी मुख्यमंत्री आहे आणि नव्हतो तेव्हाही तिथे सर्व मानपान मिळत होता. आता तर मुख्यमंत्री आहे…बंदोबस्त मिळेल. मी व्यवस्थित जाईन, पूजा वैगेरे करुन व्यवस्थित परत येईन. पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाही.  राम मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. हे मंदिर फक्त हिंदुस्थान नाही तर जागतिक कुतुहूलाचा विषय आहे. करोनामुळे आज सर्व मंदिरांमध्ये येण्या जाण्यावर बंदी आहे. मी जाऊन येईन, पण लाखो रामभक्त जे तिथे उपस्थित राहू इच्छित आहेत त्यांचं तुम्ही काय करणार आहात ? त्यांना तुम्ही अडवणार की येऊ देणार ? त्यांच्यातून कळत-नकळत करोनाचा प्रसार होऊ देणार ?,” अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

“हा आनंदाचा क्षण आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तुम्ही याचं ई-भूमिपूजन करु शकता,” असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी यावेळी शरयूच्या किनाऱ्यावर करोना असल्याने आरती करण्यापासून रोखण्यात आल्याचा उल्लेख केला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “त्याआधी आपण गेलो होतो तेव्हा हालण्यासाठीही जागा नव्हती. लाखो लोकांची भूमिपूजनासाठी उपस्थित राहण्याची भावना आहे त्यांना तुम्ही कसं अडवणार आहात?”.

“मी दोन ते तीन वेळा अयोध्येला गेलो आहे. पण मी अंधश्रद्धाळू नाही. माझे आजोबा, वडील यांची मतं मला चांगली माहिती आहेत. माझे आजोबा नास्तिक नव्हते. त्यांची देवी, देवतांवर श्रद्धा होती. माझे वडीलही अंधश्रद्धाळू नव्हते. अंधश्रद्धा, नास्तिक आणि आस्तिक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एक पुसटशी रेष आहे जी महत्त्वाची आहे. मी जेव्हा अयोध्येत जाऊन तिथे गाभाऱ्यात उभं राहिल्यावर मला जो अनुभव आला, तो इतरांनाही आला असेलच. त्यामुळे या विषयावरुन कोणी माझ्याशी वाद घालू नये किंवा शिकवू नये,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 9:48 am

Web Title: shivsena sanjay raut interview maharashtra cm uddhav thackeray ayodhya ram temple bhumi pujan sgy 87
Next Stories
1 महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस केलं तर? उद्धव ठाकरे म्हणतात…
2 “भाषण पाठ करून गेलो अन् विसरलो”; उद्धव ठाकरेंनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा
3 “…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली”, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
Just Now!
X