उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत घेतली असून त्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असं लिहिलं आहे.

या प्रोमोमध्ये शरद पवारांनी काही महत्त्वाची विधानं केली आहे. “उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही,” असं शरद पवार बोलत असल्याचं दिसत आहे. तसंच राज्यात सत्ताकेंद्र एकच असलं पाहिजे असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याचं अनेकदा बोललं गेलं आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांच्याकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल असून पडद्यामागून ते सरकार चालवत असल्याचंही अनेकदा विरोधकांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अनेकदा हे दावे फेटाळून लावले आहेत. दरम्यान शरद पवारांची नेमकी भूमिका किंवा काय मत आहे याचा उलगडा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून होणार आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत.

एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचे टिझर प्रसिद्ध केले आहेत. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. लाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भाग प्रसिद्ध होणार आहे.