बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये करोना संपलाय का ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसं जाहीर करा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. “हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“निवडणूक लढण्यासंबंधी शिवेसना नक्की विचार करेल. पण देशात सध्या अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना हातावर फक्त काळी शाई लावून घ्यायची नाही. ऑनलाइन निवडणुकीमुळे गुप्तता टिकेल का ? याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे,” असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.

“लालूप्रसाद यादव आज इस्पितळात आहेत. काँग्रेसचं तिथं फार अस्तित्व नाही. अशावेळी जनता दल युनायटेड आणि भाजपा एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी लोकांच्या मनात शंका आहे. पण लोकशाहीत शंकांचा विचार न करता लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. “निवडणुका घाईघाईत होत नसून वेळेतच होत आहेत, मात्र सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नाही,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- करोना काळ असला तरीही बिहार पुन्हा जिंकणारच, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

“बिहारमध्ये कृषी आणि कामगार बिलाचा काही फरक पडणार नाही. तिथे फक्त जात आणि धर्म हा मुद्दा असून अनेकदा गरीबी हादेखील मुद्दा नसतो. नितीश कुमार २४ वर्ष तिथे मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी सुप्त राग असल्याचं दिसत आहे. समोर विरोधी पक्ष किती ताकदीने उभा राहतो यावर सर्व अवलंबून आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

आणखी वाचा- करोना रुग्णांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयोगानं केली खास व्यवस्था

“बिहार निवडणुकीत सुशांत सिंह प्रचाराचा मुद्दा असावा म्हणूनच तर केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून राजकारण केलं. जेडीयूने आतापासूनच सुशांतच्या नावे पोस्टर छापून प्रचारात आणले आहेत. विकासाचा कोणताही मुद्दा नाही, कामासंदर्भातील मुद्दे नाहीत, सुशासन नाही म्हणून मुंबईतील मुद्दे प्रचारात आणले आहेत. तेथील राज्याच्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदे ओढण्याचं काम केलं. राजीनामा दिला असून बक्सरमधून ते निवडणूक लढत आहेत. सुशांत सिंह प्रकऱणात हे सर्व आधीच ठरलं होतं, त्याप्रमाणे नाट्य पुढे चाललं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आणखी वाचा- मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं असं विचारावं लागेल – संजय राऊत

“सीबीआय कुठेच दिसत नाही त्यामुळे तपास पुढे जाईल असं वाटत नाही. मारुती कांबळेचं काय झालं ? तसं आता मुंबई, महाराष्ट्राच्या लोकांना बिहारच्या पोलिसांना, तेथील राज्यकर्त्यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवढणुकीचा निकाल जाहीर होईल.