News Flash

संजय राऊत करणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना विनंती, म्हणाले…

"मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना...."

बिहारमधील मुंगेर येथे झालेल्या हिंसाचावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला असून हा हिंदुत्वावर हल्ला असल्याची टीका केली आहे. सामना संपादकीयमधूनही मुंगेर हिंसाचारावर भाष्य करत कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा असा उपहासात्मक सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याप्रकरणी विनंती करणार असल्याचा टोला लगावला आहे.

“आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपाने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नेमकं प्रकरण काय?
एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत असतानाच बिहारमधील मुंगेरमध्ये सध्या चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरलं आहे. मुंगेरमधील परिस्थितीची चक्क केंद्रीय निवडणूक आयोगाला दखल घ्यावी लागली. मुंगेरमध्ये सलग दुसऱ्यांदा हिंसेचा भडका उडाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंगेरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

“बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो”

मुंगेरमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा हिंसाचारानं टोक गाठलं. याचं मूळ कारण आहे दूर्गा मूर्ती विसर्जनावेळी झालेला वाद. राज्यात निवडणूका असल्यानं जिल्हा प्रशासनानं दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी २६ ऑक्टोबरपर्यंतचं वेळ दिली होती. मुंगेरमधील पंडित दीन दयाल चौकाजवळील शंकरपूरमध्ये याच काळात पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. याच वादातून मध्यरात्री गोळीबार करण्यात झाला. यात एका १८ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. तर इतर काही लोक जखमी झाले होते.

बिहारमधील मुंगेरमध्ये काय घडलं? का उडतोय हिंसेचा भडका?

या घटनेवर पोलीस प्रशासनानं असं म्हटलं होतं की, मूर्ती विसर्जनावेळी काही समाजकंटकांनी धिंगाणा घातला. त्यातच पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला. यात अनेक पोलीसही जखमी झाले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेनंतर मुंगेरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण होत गेली आणि पोलिसांविरुद्ध स्थानिक नागरिकांचा रोष वाढत गेला. हा मुद्दा बिहारमध्ये महत्त्वाचा बनला आहे.

गुरूवारी काय झालं?
मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या कारवाईचा निषेध करत अनेक तरूण रस्त्यावर उतरले. हे तरुण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले. तिथे प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर तरुणांच्या जमावानं पूरब सराय ठाण्यावर हल्ला केला. कार्यालयाची प्रचंड तोडफोड करत जाळपोळ केली. यात पोलिसांची एक गाडीही जाळण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई
मुंगेरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगानं तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले. आयोगानं मुंगेरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची बदली करण्याचे आदेश दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मगधच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानंतर तातडीनं जिल्हाधिकारी व पोली अधीक्षकांची बदली करण्यात आली असून, जिल्हाधिकारी पदी रचना पाटील, तर मानवजीत सिंह ढिल्लो यांच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 11:32 am

Web Title: shivsena sanjay raut on bihar munger violence bjp maharashtra governor bhagat singh koshyari sgy 87
Next Stories
1 मोहम्मद पैगंबरांचा शांती, त्यागाचा संदेश आचरणात आणू-अजित पवार
2 शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेवर? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 “उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”
Just Now!
X