भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला लगावला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलही खुलासा केला. ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती
दरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- शरद पवारांनी NDA सोबत यावं, शिवसेनेसोबत राहण्यात काही फायदा नाही – रामदास आठवले
“पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 29, 2020 10:56 am