अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन सध्या भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असल्याचं दिसत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबामध्ये जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरुन टीका केली आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपावर निशाणा साधत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा शब्दांत किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र”.

आणखी वाचा- ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले…

किरीट सोमय्यांनी काय म्हटलं आहे?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार
झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“२१ सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

आणखी वाचा- संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’; म्हणाले…

“काहीही संबंध नसणारी दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपल्या पत्नीचं नाव देतात याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे. मी पण महाराष्ट्र्चाचा एक नागरिक आहे तर मला समजवून सांगणार का? रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्यातही काय संबंध आहे? एकत्र येण्यामागचं प्रयोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही तर मुख्यमंत्री आहात म्हणून हे प्रश्न विचार आहोत,” असंही ते म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांचे इतर काही व्यवहार आहेत हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ते मित्र, नातेवाईक असू शकतात… पण आम्हाला त्याबद्दल सांगा. शेतजमिनीचा व्यवहार झाला की राज्यातील जनतेच्या लोकांचाय मनात अनेक शंका निर्माण होतात,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

आणखी वाचा- खरंच हे जमिनीशी जोडले गेलेले मुख्यमंत्री आहेत; भाजपा नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला

अन्वय नाईक कुटुंबाचा खुलासा
किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली आहे. “मला बऱ्याच लोकांकडून कळलं असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते,” असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे.

“जमीन कोणी विकत का देऊ शकत नाही? हा योग्य मार्गाने झालेला व्यवहार आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना आता का समस्या जाणवत आहे. त्याचा आत्महत्येच्या प्रकरणाशी काय संबंध आहे. किरीट सोमय्या नेमकं काय दाखवू इच्छित आहेत?,” अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. “किरीट सोमय्या यांना काही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, तुम्ही कधीही बोलवा,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“किरीट सोमय्या यांना राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचं काय प्रयोजन आहे हे मलाच विचारायचं आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?,” अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा केली.

“किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत,” अशी टीका आज्ञा नाईक यांनी केली आहे. “लोक कित्येक वस्तू विकत घेतात. या वस्तूंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. किरीट सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे.