बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी आपण बाबरीपासून ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले अंगावर घेतले असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्या शहर आणि राज्याच्या अभिनामासाठी लढा देण्यापासून ही गोष्ट रोखणार नाही असंही सांगितलं आहे.

“अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने खटला दाखल केला असून मला प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी उभं राहण्यापर्यंत अनेक खटले मी अंगावर घेतले आहेत. ही गोष्ट मला माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

कंगना रणौतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरोधात रोष व्यक्त झाला होता. संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात तर ट्विटरच्या माध्यमातून शाब्दित युद्ध रंगलं होतं. यानंतर कंगनाने मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत असून कुणाच्या बापाची हिंमत असेल तर मला अडवून दाखवा आहे असं आव्हानच दिलं होतं. कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षाही पुरवली होती. कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार होती त्याच दिवशी सकळाी जुहू येथील तिच्या ऑफिसचा काही भाग अनधिकृत ठरवत कारवाई कऱण्यात आली. या प्रकाराविरोधात कंगनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कंगनाकडून दोन कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.