23 November 2020

News Flash

“शरद पवार असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत”

"खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात"

एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत शरद पवार यांनी भाजपाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश दिला असेल असंही ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

“एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं. इतका कठोर निर्णय़ जर शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपामधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात”.

भाजपच्या स्थापनेपासून गेली चार दशके पक्षात कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मानसिक छळामुळे पक्ष सोडत असल्याचे खडसे यांनी जाहीर केले. ते २३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

भाजपमध्ये अन्याय होत असल्याची भावना अनेकदा जाहीरपणे मांडणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. लवकरच पक्षांतर करण्याचे संकेत खडसे यांनी अलीकडेच दिले होते. अखेर बुधवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले. खडसे यांचा समावेश लवकरच मंत्रिमंडळात होण्याची शक्यता असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री राजीनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

“भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी छळले होते. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला, याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 1:29 pm

Web Title: shivsena sanjay raut on eknath khadse ncp sharad pawar sgy 87
Next Stories
1 मुंबई, पुण्यात कांदा १०० रुपये किलो
2 उपमुख्यमंत्री अजित पवार घरी क्वारंटाइन; सर्व बैठका रद्द
3 “सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनाची नाही किमान मनाची लाज आहे?”
Just Now!
X