हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात झालेल्या गर्दीमुळे उत्तराखंड आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. शाहीस्नानासाठी झालेल्या गर्दीनंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र सरकार, प्रशासन, आरोग्यव्यवस्था देशातील सर्वोत्तम आहे. आम्ही सगळे मुख्यंत्र्यांच्या नेतृत्वात ही लढाई लढत आहोत. रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करा. हरिद्वारमध्ये काय झालं..लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. राज्यात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणलं. लोकांना आवडत नसलं तरी पण सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

चिंतेत भर! कुंभमेळ्यात १०२ भाविक निघाले करोना पॉझिटिव्ह

लॉकडाउन संपूर्ण देशात लावला तरी आश्चर्य नाही
“मला जे काही चित्र दिसत आहे त्यानुसार महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर असा निर्णय लावला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही. काल हरिद्धावरला सुद्धा लाखो लोक एकत्र आले, पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत त्यामानाने महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आहे. कायदा आणि नियमांचं पालन होत आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“गुढीपाडव्याला लोक मार्केट, फूल बाजारात गेल्याचं तुम्ही दाखवत आहात. पण ते अपरिहार्य आहे. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे आणि लोक ते करतही आहेत. सरकार आणि प्रशासन या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये शिखंडी कोण?
“पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं युद्ध सुरु आहे ते नवं महाभारत आहे. जसं त्या महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाही…अगदी शिखंडीला पुढे करुन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये हे शिखंडी कोण आहेत ज्यांना पुढे करुन हे युद्ध खेळलं किंवा लढलं जात आहे. ममता बॅनर्जी यांनी नियमभंग केला असेल तर कोणीही कायदा आणि आचारसंहितेच्या वर नाही. पण फक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमभंग केला आहे का? दिल्ली तसंच देशभरातून जे नेते येत आहेत त्यांनी कोणीच केले नाही का? की त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.

फडणवीसांना शुभेच्छा
फडणवीसांनी राज्यात करेक्ट कार्यक्रम करुन दाखवतो असं म्हटलं असून त्यावर बोलताना ते म्हणाले की, “आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत. फडणवीस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व्यक्तीगत शत्रू नसतात. राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू. त्यामुळे विरोधी पक्षांना आमच्या शुभेच्छा आहेत. सरकार पाडण्याची नवीन तारीख त्यांनी ठरवली असेल तर त्यासाठीही शुभेच्छा आहेत”.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कॅबिनेट, प्रशासन २४ तास काम करत आहेत. पुढील गुढी आरोग्यदायी आणि मोकळ्या वातावरणात उभारण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.