करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून अनेक राज्यांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देशात पुन्हा एकदा गंभीर स्थिती झाल्याने लॉकडानसंबंधी चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडियन एक्स्प्रेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

देशात पुन्हा कडक लॉकडाउन लागणार का?; अमित शाह म्हणाले…
राज्यात रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय राऊतांनी केलं भाष्य; म्हणाले…

अमित शाह यांनी घाईत लॉकडान घेण्याची गरज नाही असं वक्तव्य केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचार करुन ते आता दिल्लीत आले असतील. जर त्यांना घाईत लॉकडाउन करण्याची गरज नाही असं वाटत असेल तर जी माणसं मरत आहेत, ऑक्सिजन तसंच बेडशिवाय तडफडत आहेत… त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर जाहीर कराव्यात”.

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा – संजय राऊत

अमित शाह यांनी काय म्हटलं आहे –
“देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही. हे खरं नाही. मुख्यमंत्र्यांसोबत दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांना मी सुद्धा उपस्थित होतो. लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. करोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठिण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू,” असं अमित शाह यांनी सांगितलं आहे.

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा
संजय राऊत यांनी संसदेचं दोन दिवासंचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.