18 September 2019

News Flash

कोहिनूर मिल प्रकरण: “…तर नरेंद्र मोदी, अमित शाह यांचीही चौकशी झाली पाहिजे” – संजय राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना याबद्दल आपल्याला काही खास वाटत नसल्याचं सांगितलं आहे. आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच उद्या जर नरेंद्र मोदींवर आरोप झाले तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं सांगत संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

“ईडी, सीबीआय, आयकर विभाग आपापल्या पद्धतीने काम करत असतात. अनेक राजकारणी उद्योग क्षेत्रात आहेत. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र कारवाईकडे राजकीय दृष्टीनं पाहणं आणि बोलणं योग्य नाही. जर उद्या मी काही चुकीचं केल नसेल तर सिद्ध करु शकतो. पुराव्याला देशात अजूनही स्थान असून लोकशाही जिवंत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

कोहिनूर मिल प्रकरण: “ईडीच्या अशा नोटिसीला मनसे भीक घालत नाही”

“आपल्या तपास यंत्रणांवर चांगले संस्कार आहेत. उद्या माझ्यावर असे काही आरोप झाले, तर माझीही चौकशी झाली पाहिजे नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे, अमित शाह, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी कोणीही असो सर्वांची चौकशी झाली पाहिजे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

तपास यंत्रणा निष्पक्ष, त्यांना काम करु द्या असं सांगत निष्पक्षपाती यंत्रणांना काम करण्याचं स्वातंत्र्य द्या. या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहणं योग्य नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी यावेळी शिवसेनेत होणाऱ्या पक्षप्रवेशांवरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरे टप्प्याटप्याने प्रवेश देत आहेत. आम्ही गाळ घेत नाही आहोत. ज्यांचा महाराष्ट्राला फायदा होईल, शिवसेनेची विचारसरणी रुजवतील त्यांनाच प्रवेश दिला जात आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच लवकरच मोठे नेते शिवसेनेच प्रवेश करतील असा गौप्यस्फोट यावेळी त्यांनी केला. कोणत्याही पक्षाचं नाव घेण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. मात्र सर्व पक्षातील लोक इच्छुक आहेत असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. महाराष्ट्रातील निवडणूक पुढे ढकलली जाईल असं वाटत नाही असंही मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

First Published on August 19, 2019 12:43 pm

Web Title: shivsena sanjay raut on kohinoor mill mns raj thackeray narendra modi amit shah sgy 87