News Flash

Coronavirus: भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र; संजय राऊतांचं मोठं विधान

"मद्रास हायकोर्टाची टिप्पणी गांभीर्यानं घेतली पाहिजे"

संग्रहित (PTI)

देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येवरुन मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी गांभीर्याने घेतली पाहिजे असं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचं मोठं षडयंत्र असू शकतं अशी शंका व्यक्त केली आहे.

“मद्रास उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे हेच आम्ही अनेक महिने सांगत आहोत. ममता बॅनर्जी, विरोधक सांगत होते. आम्ही सांगत होतो तेव्हा दिल्लीचील काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. “निवडणूक आणि करोनाचा काही संबंध नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणूक नाही तिथंही करोना झाल्याचं त्यांचं स्पष्टीकरण आहे. पण भाजपाने बंगाल, केरळ, तामिळनाडूत प्रचारासाठी संपूर्ण देशातून लोक तिथे जमा केले. हे चुकीचं नाही, निवडणुकीत अशी रणनीती असते. पण सध्या देशात परिस्थिती ठीक नाही. जर काही लोक कुंभमध्ये गर्दी होते आणि करोनाचा फैलाव होतो म्हणून आक्षेप घेत असतील, तर पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये निवडणुकीमुळे अजून गर्दी होते,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं म्हटलं आहे. पण निवृत्त झालेल्या आयुक्तांना राज्यपाल म्हणून पाठवत राजकीयदृष्या रिटर्न गिफ्ट दिलं असल्याचं कळत आहे,” असं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं.

“माझा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे. मोदींनी ज्या पद्धतीने संकटाशी लढण्यासाठी पकड घेतली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी त्यांना धोरण आखलं आहे ते पाहता मद्रास कोर्टाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील असा मला विश्वास आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत आहे का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल तर आपण सर्वांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसोबत उभं राहिलं पाहिजे. जी निती मोदी आखतील त्याच्यासाठी आम्ही उभे राहू असा विश्वास मला द्यायचा आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचा नेता किंवा सरकार यांचा अपमान होणं ठीक नाही. परदेशात प्रसारमाध्यमं, सोशल मीडियावर चित्र रंगवलं जात असून त्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो”. भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचं हे मोठं षडयंत्रही असू शकतं अशी शंका व्यक्त करताना आपण सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 10:44 am

Web Title: shivsena sanjay raut on madras high court coronavirus central government sgy 87
Next Stories
1 अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष
2 खाटांअभावी अत्यवस्थ करोना रुग्णांची तडफड
3 शहरबात :  ..ही आग विझणार कधी?
Just Now!
X