News Flash

राज्यपाल विधानपरिषदेची यादी मंजूर करतील का? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. परिवहनमंत्री अनिल परब, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या तीन पक्षांच्या मंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे १२ नावांची यादी सादर केली. दरम्यान राज्य सरकारसोबत सतत होणारं शाब्दिक युद्ध पाहता राज्यपाल सहजासहजी यादी मंजूर करणार नाहीत असं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“राज्यपाल हे कोणताही राजकीय बखेडा निर्माण करणार नाहीत. राज्यपाल सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे, राज्यपालांचं आमच्यावरही प्रेम आहेत. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे. या प्रेमातूनच पुढील सगळा कारभार सुरळीत होईल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- …म्हणूनच उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी

दरम्यान उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी देण्याचं समर्थन करताना ते म्हणाले की, “उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारी अभिनेत्री सभागृहात गेल्यास महाराष्ट्राला फायदाच होईल”.

यादीत कोणती नावं आहेत –
भाजपामधून अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर

आणखी वाचा- ‘श्रद्धा और सबुरी’, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने १२ नावांची शिफारस राज्यपालांना सादर करण्यात आली. राज्यपाल या नावांची आता छाननी करतील. घटनेच्या १७१ (५) कलमानुसार, साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ आणि समाजसेवा या पाच क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती करता येते. घटनेतील तरतुदीनुसार ही सारे नावे आहेत का, याचा आढावा राज्यपालांकडून घेतला जाईल. घटनेतील तरतुदीनुसार ही नावे नसतील तर राज्यपाल नावे फेटाळू शकतात.

* महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांनी मान्य केली नव्हती. तेव्हापासून उभयतांमध्ये कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाही.

* मंदिरे उघडण्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात निधर्मवादाचा मुद्दा मांडला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांना अनेकदा लक्ष्य केले. राजभवनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात जनराज्यपाल असा उल्लेख करण्यात आला असता घटनेत असे पदच नाही याकडे पवारांनी लक्ष वेधले. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सहजासहजी सारी नावे मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:08 pm

Web Title: shivsena sanjay raut on maharashtra governor bhagat singh koshyari maharashtra legislative council sgy 87
Next Stories
1 ‘श्रद्धा और सबुरी’, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण
2 … हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेचा भाजपाला टोला
3 मनाई आदेशास हरताळ
Just Now!
X