News Flash

काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या पुण्याईमुळेच देशाचा कारभार सुरु आहे – संजय राऊत

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संजय राऊतांची टीका

काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार सुरु आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी असल्याचं म्हटलं आहे. तसंच नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही म्हटलं आहे.

“राहुल गांधी यांचं म्हणणं सरकारने गांभीर्यानं ऐकलं पाहिजे. सरकारची दोन वर्षे तर करोनामध्येच निघून गेली. देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच पुण्यावर देश चालत आहे. नवीन काही झालेलं नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“सरकारला लोक निवडून देत असतील तर लोकांचा विश्वास आणि बहुमत मिळालेलं आहे. पण आजही देशात महागाई, बेराजोगारी आहे. करोनानंतर पसरलेली अराजकता कायम आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात…प्रत्येकाला अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचं नाही. फक्त रोजगार, रोजी रोटी मिळायला हवी. सात वर्षात देशातील जनतेला हे मिळालं का याचं चिंतन करायला हवं,” असा सल्ला संजय राऊतांनी मोदी सरकारला दिला आहे. “मोदींकडे उत्तम नेतृत्वक्षमता आहे. आजही त्यांच्याकडून आपण ते देशाला योग्य दिशा, मार्ग दाखवतील अशी अपेक्षा करु शकतो,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“पश्चिम बंगाल आणि केंद्रातील संघर्ष कायम आहे. केंद्र सरकार राज्यांचं मायबाप असतं. एखाद्या राज्यात एखादं सरकार निवडून आलं असेल तर त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी केंद्राची असते. त्यामुळे केंद्राने जुन्या गोष्टी, राजकीय मतभेद विसरुन राज्य सरकारला आपल्या मुलाप्रमाणे जपण्याचं दायित्व केंद्राचं असतं. ममता बॅनर्जी यांचं म्हणणं दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. मोदींनी वादळाचा फटका बसलेल्या अनेक राज्यांचा दौरा केला. पण फक्त पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेत्यांना बोलावलं ही गोष्ट खटकणारीच आहे. ममता बॅनर्जी यांनी मुद्दा उचलला असून मोदींनी त्यावर विचार करणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

मोदींनी महाराष्ट्र दौरा न करण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “सरकारने स्वत: वाद उकरुन काढू नयेत. नरेंद्र मोदी देशाचे नेते असून प्रत्येक राज्याला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. तुम्ही देशाचे सर्वोच्च नेते असून लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे केंद्राने आपण सर्व राज्यांचे पालक आहोत अशा भूमिकेतूनच पहायला हवं”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 10:39 am

Web Title: shivsena sanjay raut on modi government completes seven years sgy 87
Next Stories
1 … त्या बदनामीच्या ‘टुलकिट’चे सूत्रधार कोण होते?; संजय राऊतांचा सवाल
2 जीएसटी परिषदेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल; केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रिगट स्थापन
3 Coronavirus : राज्यात दिवसभरात ३१ हजार ९६४ जण करोनामुक्त; ४४३ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X