देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर केंद्र सरकारवर होणारी टीका आणि उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपामध्ये बैठक पार पडली. आसएसएस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये विचारमंथन सुरु असून केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्यांची प्रतिमा सुधारण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आवाहन केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र, उत्तर प्रदेश सरकारची प्रतिमा सुधारण्याचे लक्ष्य

“मोहन भागवत आदरणीय आहेत. अनेक विषयावर त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं अशी आमची अपेक्षा असते. कारण त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेतं वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिराइतकाच महत्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळं काही सुरु आहे त्यावर मोहन भागवत यांनी आपलं मत व्यक्त करावं,” असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं आहे.

…तर संपूर्ण राजभवनला पेढे वाटू
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, “फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनला आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भूतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईल वर अद्याप निर्णय का होत नाही असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का?”.

“ही फाईल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने एकमतानं १२ सदस्यांची नावं दिलेली आहे. त्यावर आठ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसं नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामात गतीमानता दाखवली तर महाराष्ट्राची परंपरा गतिमान राहील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

टूलकिट प्रकरणावरुन आम्हीदेखील मजा पाहत आहोत
“टुलकिट प्रकरणावरुन देशभरात चर्चा सुरू आहे. पण सगळ्या समाजमाध्यमांचा वापर भाजपाने विरोधकांविरोधात केला आहे. प्रकरण त्यांच्यावर उलटल्यावर धाड टाका, याला पकडा असं सगळं सुरू आहे. आम्हीदेखील मजा पाहत आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.