26 November 2020

News Flash

“गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणतं प्रायश्चित्त घेणार”; शिवसेना संतापली

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठं वादंग पाहायला मिळालं. त्यावरून राजकीय वातावरणही तापलं होतं. बिहार-महाराष्ट्र, बिहार पोलीस व महाराष्ट्र पोलीस असा शाब्दिक संघर्षही बघायला मिळाला. त्यातूनच अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस, मुंबईविषयी वादग्रस्त विधान केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अखेर सुशांत प्रकरणावरून डोकं वर काढलेल्या वादाची धूळ ‘एम्स’च्या अहवालानं खाली बसली. मात्र, हा अहवाल समोर आल्यानंतर शिवसेनेनं या प्रकरणात महाराष्ट्र, मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून उपस्थित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शंका पूर्णविराम मिळाला. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची तपास करण्यासाठी सीबीआयनं नेमलेल्या एम्सच्या समितीनं आपला चौकशी अहवाल सूपुर्द केला. यात सुशांतचा मृत्यू आत्महत्याच असल्याचं म्हटलं आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर शिवसेनेनं सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. “सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. ‘ठाकरी’ भाषेतच बोलायचे तर सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस ११० दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारनं अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे,” असं टीकास्त्र शिवसेनेनं डागलं आहे.

“बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले. मुंबई पोलीस सुशांतचा तपास करू शकत नाहीत म्हणून सीबीआयला बोलवा असे किंचाळणाऱ्यांनी मागच्या ४०-५० दिवसांत सीबीआय काय करतेय? हा साधा प्रश्न विचारला नाही. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

“त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?”

“सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!,” असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 7:07 am

Web Title: shivsena sanjay raut sushant singh rajput kangana ranaut gupteshwar pandey bmh 90
Next Stories
1  कास पठार फुलले.. पण पर्यटकांना बंदी
2 रायगड किल्ला संवर्धनाची कामे रखडली..
3 ‘राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू’
Just Now!
X