News Flash

“राजीव सातव तू हे काय केलंस?; चार दिवसांपूर्वीच आपण नि:शब्द हाय हॅलो केलं होतं”

"तुला श्रद्धांजली कोणत्या शब्दात वाहू?"

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे राजीव सातव करोनाची लागण झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले होते. करोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर लवकरच ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसने युवा नेता गमावला! खासदार राजीव सातव यांचं निधन

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “चार दिवसांपूर्वीच व्हिडिओ कॉलवर आपण नि:शब्द हाय हॅलो केलं होतं, तुला श्रद्धांजली कोणत्या शब्दात वाहू?,” अशी हतबलता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांचं ट्विट-
“राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे…चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..तुला श्रद्धांजली कोणत्या शब्दात वाहू?”.

हा फक्त काँग्रेस पक्षावर आघात नाही
“राजीव सातव यांचं दुःखद निधन हा फक्त काँग्रेस पक्षावर आघात नाही. महाराष्ट्रचं खूप मोठं नुकसान झालं आहे. राष्ट्रीय राजकारणामध्ये राजीव सातव हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते, गेल्या काही वर्षापासून प्रस्थापित होत होते. दुसऱ्या पक्षात असले तरीही सर्वांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होत असताना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या मनात काय आहे यासाठी आमच्यात अनेकदा चर्चा होत होती. सरकार व्हावं यासाठी राजीव सातव दिल्लीच्या वर्तुळात शर्थीने प्रयत्न करत होते. पाच दिवसांपूर्वी आमचा व्हिडीओ कॉल झाला. त्यांना बोलता येत नव्हतं, पण त्यांनी मला हाताने विजयी मुद्रा दाखवत लवकर बरे होऊन भेटतो असं सांगितलं होतं,” असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना म्हटलं.

“राजीव सातव यांच्या जाण्याने फक्त काँग्रेस पक्षाचं नाही तर देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचा प्रमुख स्तंभ कोसळला आहे. राज्यसभेत ते काँग्रेसची बाजू चांगल्या पद्धतीने मांडंत होतं. त्यांचे जाणे दुर्दैवी आहे. भविष्यात महाराष्ट्राचा नेता म्हणून दिल्लीत उभं राहणारं जे नेतृत्व होतं त्यात राजीव सातव यांचा चेहरा मला नेहमी दिसायचा. राहुल गांधी यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी राजीव याच्याशी बोलायचो,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान राजीव सातव यांच्यावर सोमवारी हिंगोलीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती विश्वजीत कदम यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 11:53 am

Web Title: shivsena sanjay raut tweet on congress rajiv satav death sgy 87
Next Stories
1 हे वृत्त धक्कादायक! महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला -शरद पवार
2 राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू नेमका काय?
3 काँग्रेसने युवा नेता गमावला! खासदार राजीव सातव यांचं निधन
Just Now!
X