राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याचं अनेकदा बोललं गेलं आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांच्याकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल असून पडद्यामागून ते सरकार चालवत असल्याचंही अनेकदा विरोधकांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अनेकदा हे दावे फेटाळून लावले आहेत. दरम्यान शरद पवारांची नेमकी भूमिका किंवा काय मत आहे याचा उलगडा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून होणार आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी मुलाखतीचा एक टिझर शेअर केला असून यामध्ये त्यांनी शरद पवारांना ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर शरद पवारांनी काय उत्तर दिलं आहे याचा उलगडा मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच होणार आहे.

या नव्या टिझरमध्ये शरद पवार महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान होतं असं सांगत आहेत. तसंच मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, त्यांची विचारधारा, कामाची पद्धत ही भाजपाच्या विचाराशी सुसंगत होती असं कधीच वाटलं नाही असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं आहे. शिवाय तीन विचारांचे तीन पक्ष, पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठिशी आहेत असंही ते सांगत आहेत.

एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचे टिझर प्रसिद्ध केले आहेत. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. लाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भाग प्रसिद्ध होणार आहे.