मी दाऊद इब्राहिमला दम दिला आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली. पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.

“रोज सकाळी सामना कुणी वाचला नाही तरी रोज टीव्हीवर सामना पाहायला मिळतोच यापेक्षा जास्त भाग्य कुठलं,” असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. “खलनायक हा समाजाचा भाग आहे. माझ्या आसपास खलनायक फिरत असतात आम्ही त्यांना बघतो. आमच्या पक्षात कुणीही खलनायक नाही. पण ज्यांसंजय राऊत यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही  असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी खलनायक आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

“आज जे सरकार स्थापन झालं आहे त्याला कुणीही खिचडी म्हणत नाही. त्याला सरकार म्हणतात. कारण त्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन शरद पवार करतात,” असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. “महाराष्ट्र सदैव काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष वाढले. निवडणुकीत दिल्लीने काँग्रेसवर जर लक्ष घातले असते तर आज संख्या वाढली असती,” अशी शक्यता त्यांनी बोलावून दाखवली.

“आत्ता आलेलं सरकार हे टेस्ट ट्यूब बेबी नाही, व्यवस्थित जन्माला घातलेलं आहे. भाजपावाले शब्द पाळणार नाहीत, त्याची मला खात्रीच होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचे आहे असं राजकारण सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?,” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

आम्ही सरकार पाच वर्ष चालवणार
शरद पवार साहेबांनी पाहिल्या दिवसापांसून सांगितलं की, आपण हे करू शकतो, काही नवीन घडवू शकतो. हे सरकार बनवायचे आणि टिकवायचे. आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणार असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारला किमान वर्षभर काम करण्याची संधी दिली पाहिजे
“देशाची लोकशाही बळकट करायची असल्यास विरोधी पक्ष सक्षम राहिला पाहिजे. यासाठी सत्ताधारी पक्षाने विरोधकांना बळ देण्याची आवश्यकता आहे. राज्यात १०५ आमदारांचा विरोधी पक्ष आहे. त्या सर्वांनी या सरकारला किमान वर्षभर काम करण्याची संधी दिली पाहिजे. विरोधाला विरोध केला जाऊ नये. चुका होऊ देत नंतर प्रश्न उपस्थित करा. उगाच करायची म्हणून टीका केली जाऊ नये,” असं मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात वेगळं चित्र असतं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जास्त लक्ष घातलं असं वाटत नाही असं यावेळी ते म्हणाले. “भाजपाने मनसेला सोबत घेतलं तर मग उत्तर प्रदेश, बिहार इतर राज्यात काय करणार त्याचा विचार करावा आणि ते त्यांना झेपणार आहे का? हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.